मलकापूर, दि. ३० जुलै : मलकापूर शहरात सोशल मीडियावर खोट्या आर्थिक प्रलोभनांच्या जाहिराती देऊन बाहेरील राज्यांतील नागरिकांना बोलावून त्यांची फसवणूक, लूटमार व मारहाण केल्या जात असल्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात लीगल फायटर फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अॅड. स्नेहल तायडे, अमोल टप (सामाजिक कार्यकर्ते),कुणाल पैठणे, कौसर खान आणि मोहनसिंग मोरे यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना सविस्तर निवेदन दिले. तसेच या निवेदनाच्या सहप्रती पोलीस अधीक्षक, बुलढाणा, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, शासकीय रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर कमी श्रमात मोठा आर्थिक मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना मलकापूर येथे बोलावले जाते. त्यानंतर त्यांची आर्थिक फसवणूक, लूटमार, मारहाण तसेच इतर गंभीर गुन्हे घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी करण्यात आली आहे.याशिवाय मलकापूर बसस्थानक, रेल्वे स्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीपर बॅनर, होर्डिंग्ज व सूचना फलक लावण्यात यावेत, ध्वनीक्षेपकाद्वारे नियमित जनजागृतीपर सूचना प्रसारित करण्यात याव्यात, सोशल मीडियावरील संशयास्पद जाहिरातींवर सायबर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी तसेच शहर पोलीस, GRP आणि RPF यांनी संयुक्तपणे रेल्वे परिसरात विशेष जनजागृती मोहीम राबवावी,अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.नागरिकांची सुरक्षा आणि मलकापूर शहराची प्रतिमा जपण्यासाठी पोलीस प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.
सोशल मीडियावरील फसवणुकीला आळा घाला; जनजागृती मोहीम राबवा- लीगल फायटर फाउंडेशन...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق