‼नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः‼
मलकापूर:- आजपासून या भूतलावर शक्ती तत्त्वाचा अर्थात देवीचा जागर सुरू होईल. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी, या शारदीय नवरात्राच्या नऊ दिवसात, या शक्तीचा संचार, समस्त ब्रम्हांडात, तिन्ही लोकांत आणि विशेष करून या पृथ्वीवर सुरू असेल. तसं पाहिलं तर शक्तीचा संचार या भूतलावर अखंड असतोच.परंतु पुढील नऊ दिवस, ही देवी, शक्ती रूपात आपल्या भक्तांच्या वास्तूत विराजित होणार असल्यामुळे, संपूर्ण वर्षात हे नऊ दिवस विशेष महत्वाचे आहेत. या काळात, प्रत्येक वास्तुत भिन्नभिन्न रूपात, शक्ती रुपात, देवीआई, अखंड विराजमान असेल.या शक्तीच्या लहरींचा संचार, सर्वत्र तिच्या भक्तांना जाणवेल. संपूर्ण भारतवर्ष या शक्तीच्या लहरींच्या संवेदनांनी भारला गेला असेल. या लहरींच्या सहाय्याने अमंगळाचा नाश करून मंगल लहरी आपल्या मनात, बुद्धीत, देहात आणि संपूर्ण वास्तुत संचारित करण्याचा आपण सर्वजण आटोकाट प्रयत्न करूया.या नऊ दिवसात, आईचा प्रत्येक भक्त, आपापल्या परीने नवरात्र उत्सवात, उपवास स्तोत्रपाठ, मंत्र, जागर, प्रार्थना, अर्चना, आरती, गोंधळ या माध्यमातून आपल्या भक्तीचा, आपल्या मनातील आईबद्दलच्या प्रेमाचा, प्रत्यय देईल. अर्थातच या सर्वांना आई वेगवेगळ्या रूपात, पण एकाच शक्ती तत्त्वातून उदंड आशीर्वाद, अभय आणि भरभरून सहाय्य करेल.या नऊ दिवसातील, तिच्या नऊ विभिन्न रूपातून, आपण या शक्तीचा जागर करूया. अर्थातच शिवतत्वाचे अंग असलेल्या शक्तीच्या, शुद्ध, सात्विक, पवित्र, तेजोमय, प्रबळ, सकारात्मक लहरींना, आपण आपल्यामध्ये सामावून घेऊन,तिच्या कृपेचा प्रसाद प्राप्त करण्याचा, आपल्या परीने, प्रयत्न करूया. आपल्या या कार्यात, भक्तीत, साधनेत, प्रार्थनेत, आरतीत, देवी आदिशक्ती, महामाया, मंगलेश्वरी, नक्कीच सहाय्यभूत होऊन आशीर्वाद देईल.चला तर मग, आज पासून शारदीय नवरात्रौत्सवाचा आनंद लूटूया आणि सर्वांसाठी सुख, शांती व समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया आणि देवीचे नवरूप व त्यांना दाखवल्या जाणाऱ्या नैवैद्याची थोडक्यात माहिती घेऊ या.शास्त्रांनुसार, दररोज देवीला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात. उपवास असो वा नसो, नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांना आवडणारा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो. तेव्हा नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य अर्पण करावा हे जाणून घेऊ.पहिला दिवस – आई शैलपुत्री– नवरात्रीची सुरूवात देवी शैलपुत्रीच्या पूजेपासून होते. असं मानलं जातं की, या दिवशी देवीला तूप अर्पण केल्याने भक्तांना आनंद, सौभाग्य आणि आरोग्य लाभते.दुसरा दिवस – आई ब्रम्हचारिणी– नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणीची पूजा केली जाते. तिला साखर किंवा मिश्री अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे आयुष्य वाढते आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं.तिसरा दिवस – आई चंद्रघंटा– नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा यांची पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी तिला दुधापासून बनवलेल्या मिठाई, खीर किंवा बर्फी अर्पण केली जाते. यामुळे जीवनातील दु:ख आणि संकटे दूर होतात असं मानलं जातं.चौथा दिवस – आई कुष्मांडा– नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा यांची पूजा केली जाते. या दिवशी तिला मालपुआ अर्पण करणे शुभ मानले जाते. याने भक्तांना बुद्धी आणि विवेकबुद्धी लाभते.पाचवा दिवस – स्कंदमाता– नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते. या दिवशी देवीला केळी अर्पण केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद मिळतो तसंच मुलांशी संबंधित चिंता दूर होतात.सहावा दिवस – आई कात्यायनी– नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने समृद्धी आणि सन्मान मिळतो असे म्हटले जाते.सातवा दिवस आई कालरात्री नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी गूळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ अर्पण केल्याने भय आणि त्रास दूर होण्यास मदत होते.आठवा दिवस महागौरी नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची पूजा केली जाते. या दिवशी नारळ किंवा नारळापासून बनवलेली मिठाई अर्पण केल्याने आनंद, समृद्धी आणि सौभाग्य मिळते.नववा दिवस आई सिद्धीदात्री नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला हलवा, पुरी आणि चणे अर्पण केल्याने वर्षभर यश आणि सिद्धी मिळते.या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती धार्मिक ग्रंथांसह विविध स्त्रोतांकडून संकलित करून केवळ माहितीसाठी दिली जात आहे.शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना न्यूज हनुमान सेना तर्फे मंगलमय शुभेच्छा.
إرسال تعليق