Hanuman Sena News

"आदर्श शिक्षकाचा गौरव"चांडक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शरद देशपांडे सर यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले



मलकापूर:- समाजाच्या भवितव्याची पायाभरणी घडवणारा खरा शिल्पकार म्हणजे शिक्षक. अध्यापनासोबतच विद्यार्थीहितासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या, शैक्षणिक नवोपक्रम राबविणाऱ्या व आपल्या सचोटीच्या कार्याने आदर्श निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा गौरव म्हणजेच ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार’. यावर्षीचा हा प्रतिष्ठित पुरस्कार लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. शरद दिगांबर देशपांडे यांना जाहीर झाला असून, त्यांच्या सन्मानाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला आहे.शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळे समाज व राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी  शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते.राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव प्राप्त निवड समितीकडून (माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे)अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक सूचना  व निकषांनुसार जिल्हास्तरावरून जिल्हा निवड समितीमार्फत निवड समितीकडे प्रस्तावांची छाननी करून, आलेल्या राज्य निवड समितीमार्फत गुणानुक्रमे गुणवत्ताधारित शिफारस केली जाते व राज्य स्तरावरून पुरस्काराचे मान्यवर शिक्षकांची गुणवत्ताधारित गुणानुक्रमे अंतिम निवड करून निवड व त्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार प्रस्ताव निवड समितीकडे करण्यात येतात. सदर निवड झालेल्या शिक्षकास एक लाख रोख बक्षीस, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्माननीय व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतो.यावर्षी आमच्या विद्यालयातील जेष्ठ, शांत, मनमिळाऊ, विद्यार्थीप्रिय व मेहनती शिक्षक श्री. शरद देशपांडे यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५’ जाहीर झाल्याने शालेय परिवारात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा पुरस्कार येत्या २२ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई येथे आयोजित समारंभात त्यांना प्रदान होणार आहे.देशपांडे सरांना अध्यापनाची प्रेरणा बालपणापासूनच मिळाली. त्यांचे वडील दिगाबर श्रीधर देशपांडे हे  शिक्षक असल्याने हा शैक्षणिक वारसा त्यांनी आत्मसात केला. त्यांनी मराठी व राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून १९९९ मध्ये चांडक विद्यालयात त्यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून सलग २७ वर्षे त्यांनी अध्यापनाची अविरत सेवा दिली आहे.अध्यापनासोबतच सरांचे साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान आहे. ‘मृदगंधाचे चांदणे’, ‘रानगंध’, ‘भावांनाकुर ’ हे त्यांचे कवितासंग्रह तर ‘माझा लेखन प्रवास’ हा लेखसंग्रह आणि ‘काळोख्यातील काजवा’ हे कथा संग्रह प्रकाशित झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात साहित्याची गोडी निर्माण करण्यास ते नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत.विद्यार्थ्यांच्या कल्पनाविस्तार कौशल्य विकसित करण्यासाठी राबविलेल्या त्यांच्या नवोपक्रमास जिल्ह्यातील माध्यमिक विभागातून पहिला क्रमांक मिळाला. त्यांनी मराठी व्याकरणाचे अनेक शैक्षणिक व्हिडिओ तयार करून यु-ट्यूब व शासनाच्या दिक्षा अ‍ॅप वर उपलब्ध केले आहेत, ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना लाभ होतो आहे.सरांच्या अध्यापनाखाली मराठी विषयातील उत्तीर्णतेचे प्रमाण ९५% पेक्षा नेहमीच जास्त राहिले आहे. शालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, नवप्रकल्प राबवणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आत्मविश्वास देणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.सरांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा (DIET), माध्यमिक शिक्षण विभाग बुलडाणा व मा. गटशिक्षणाधिकारी मलकापूर यांचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले. त्यामुळे त्यांची यशाची वाट अधिक सुकर झाली.संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत देशपांडे सरांचे नाव विशेष ठरते. यापूर्वी संस्थेचे माजी प्राचार्य व सध्याचे अध्यक्ष भाऊसाहेब डोरले आणि संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. भाऊसाहेब मेरेकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता देशपांडे सर हे संस्थेतील तिसरे शिक्षक ठरले आहेत ज्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळत आहे.देशपांडे सरांनी अनेक वर्षे जिल्हा व विभागीय स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. सध्या ते बालभारती ९ वी व १० वी मराठी विषय पाठ्यपुस्तक निर्मिती समितीचे सदस्य आहेत.सरांचे व्यक्तिमत्त्व हे सचोटी, प्रामाणिकपणा व विद्यार्थ्यांवरील प्रेम या गुणांनी सजलेले आहे. त्यांच्या सन्मानाने केवळ आमचे विद्यालयच नव्हे तर संपूर्ण बुलडाणा जिल्ह्याचा शैक्षणिक वारसा उज्ज्वल झाला आहे.या मानाच्या सन्मानामुळे देशपांडे सरांची कार्यगाथा नवे प्रेरणास्थान ठरेल.

Post a Comment

أحدث أقدم