Hanuman Sena News

​कै. वसंतराव नारायणराव लाहुडकर विद्यालयात 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' उत्साहात साजरा..!



​मलकापूर :
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून 'अभिजात भाषेचा' बहुमान मिळाल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, लोक सेवा शिक्षण समिती संचलित कै. वसंतराव नारायणराव लाहुडकर (पाटील) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, दसरखेड येथे ९ ऑक्टोबर रोजी 'मराठी अभिजात भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला.​कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. ओ. करपे सर उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. भोजने साहेब, तर प्रमुख अतिथी म्हणून जनता कला व वाणिज्य महाविद्यालय मलकापूरचे प्राध्यापक डॉ. सिद्धार्थ इंगळे सर व प्राध्यापक तडवी सर उपस्थित होते.​कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. सचिन एस. राऊत यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी सम्राट राहुल बिर्हाडे याने ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी" या प्रसिद्ध काव्यपंक्तींचा संदर्भ देत मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. तसेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेचा गौरव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची प्रतिष्ठा कशी वाढली, यावर आपले विचार मांडले. यानंतर विद्यार्थी ईश्वर पाटील यानेही समयोचित मनोगत व्यक्त केले.​उपस्थित मान्यवर श्री. भोजने साहेब,डॉ. सिद्धार्थ इंगळे सर आणि प्रा. तडवी सर यांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेची महती सांगत मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य एम. ओ. करपे यांनी मराठी भाषेचे महत्त्व, शालेय व उच्च शिक्षणातील अध्ययन-अध्यापन पद्धती आणि मराठी भाषेच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या विविध रोजगाराच्या नवीन संधी यावर सविस्तर व प्रेरणादायी मार्गदर्शन केले.​कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला. उपस्थितांचे आभार प्रा. अरुण के. बारोटे यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी  एस. पी. चव्हाण सर, श्री. के. एल. डहाके सर तसेच गजानन कवडे व सुभाष बावस्कर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post