Hanuman Sena News

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत कै.व्ही.एन.लाहुडकर (पाटील )विद्यालय दसरखेडचे घवघवीत यश; जिल्हास्तरावर निवड!



​मलकापूर (प्रतिनिधी):
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मलकापूर तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७' पार पडल्या. या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या मैदानी कबड्डी सामन्यात लोकसेवा शिक्षण समिती, दसरखेड द्वारा संचलित कै. वसंतराव नारायणराव लाहूडकर (पाटील) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर धडक मारली आहे.​संघाचा कर्णधार शुभम बिऱ्हाडे आणि उपकर्णधार दिपक बिऱ्हाडे यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर संघाने विजयश्री खेचून आणली. पुढील जिल्हास्तरीय सामने जी. व्ही. मेहता विद्यालय, खामगाव येथे पार पडणार आहेत.याआधीही विद्यालयाने विविध क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली असून, वेटलिफ्टिंग स्पर्धेत आदर्श महानुभाव याने रौप्य पदक पटकावले आहे, तर कॅरम स्पर्धेत कु. देवयाणी दिपक खराटे हिने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.​कबड्डी संघाच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव राजूभाऊ साठे, मुख्याध्यापक एम. ओ. करपे, प्रा. सचिन राऊत प्रा. अरुण बारोटे; शिक्षक संतोषकुमार चव्हाण आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे दसरखेड गावात आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थ व पालकांकडून सर्व यशस्वी खेळाडूंचे कौतुक होत आहे तसेच पुढील जिल्हास्तरीय सामन्यांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

أحدث أقدم