Hanuman Sena News

लग्नासाठी चक्क पोलीस झाल्याचा बनाव ! खोटे फ्लेक्स लावून मारले 'इम्प्रेशन; लग्नासाठी तरुणाचा अजब खटाटोप...



पुणे :  लग्न जमत नसल्याने मुलींवर आणि समाजावर प्रभाव पाडण्यासाठी एका तरुणाने चक्क पोलीस अधिकारी झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक आणि तितकाच हास्यास्पद प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. आपण पुणे शहर पोलीस दलात रुजू झाल्याचे खोटे फ्लेक्स शहरभर लावून आणि व्हॉट्सअॅपवर वर्दीतील फोटो ठेवून 'इम्प्रेशन' मारण्याचा या तरुणाचा खटाटोप अखेर त्याच्याच अंगलट आला आहे.लग्न जमत नसल्याने स्वतःला पुणे पोलीस दलात रुजू झाल्याचे भासवून फ्लेक्स लावणाऱ्या तरुणाविरुद्ध नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकाच वेळी धक्का आणि चर्चेला उधाण आले आहे.ऋषिकेश राजू जाधव (वय २६, रा. नऱ्हे रोड) असे या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ली लग्न जमवणे अनेक तरुणांसाठी कठीण झाले आहे. सरकारी नोकरी, विशेषतः पोलीस दलात नोकरी असली की लग्नासाठी सहज स्थळे चालून येतात, या समजुतीतून ऋषिकेशने हा 'शॉर्टकट' शोधून काढला. आपण पुणे शहर पोलीस दलात भरती झाल्याचे त्याने भासवण्यास सुरुवात केली. केवळ लोकांशी खोटे बोलून तो थांबला नाही, तर त्याने स्वतःच्या अभिनंदनाचे मोठमोठे फ्लेक्स शहरात विविध ठिकाणी लावले. एवढेच नव्हे, तर पोलीस गणवेशातील (वर्दीतील) स्वतःचे फोटो मोबाईलच्या 'व्हॉट्सअॅप स्टेटस'ला ठेवून नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये रुबाब मारण्याचा प्रयत्न केला. 'पोलीस अधिकारी' झाल्याचे दाखवून थेट लग्नाची लाईन लावण्याचा त्याचा हा 'फिल्मी प्लॅन' होता. जाधव याने शहरातील विविध ठिकाणी स्वतःच्या नावाचे व पोलीस गणवेशातील छायाचित्र असलेले फ्लेक्स लावून “पुणे पोलीस दलात निवड” झाल्याचा आभास निर्माण केला. तसेच त्याने गणवेशातील फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवून लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला.

Post a Comment

Previous Post Next Post