Hanuman Sena News

आदर्श प्राथमिक विद्यालय, मलकापूरला ‘गौरव महाराष्ट्राचा आदर्श शाळा’ पुरस्काराने सन्मानित!


मलकापूर:- दि. 8 ऑक्टोबर 2025 — नगर सेवा समिती, मलकापूरद्वारा संचालित आदर्श प्राथमिक विद्यालयाने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या बळावर ‘गौरव महाराष्ट्राचा आदर्श शाळा पुरस्कार 2025’ प्राप्त केला आहे. हा सन्मान पहाट फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येत असून, पुरस्कार वितरण समारंभ 11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नांदापूरकर सभागृह, मराठवाडा साहित्य परिषद, पैठण गेट, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.‘आदर्श’ या नावातच दडलेली प्रेरणा आणि नगर सेवा समितीच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले हे विद्यालय, मलकापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक चमकता तारा म्हणून ओळखले जाते. या शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालकांची पहिली पसंती बनलेली असून, मराठी माध्यमात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आजही उत्साहाने गर्दी होताना दिसते.मा. संचालक मंडळाच्या मार्गदर्शन व  मुख्याध्यापक श्री. विजय चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वाखाली  सर्व शिक्षक-शिक्षिकांच्या अथक परिश्रमामुळे शाळेने शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व, गायन, नृत्य, क्रीडा, निबंध लेखन, विज्ञान प्रदर्शन आदी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.याशिवाय, विद्यार्थ्यांना एम. टी. एस, मंथन  , आय एम विनर,आनंद स्कॉलर, आणि स्कॉलरशिप परीक्षा या उपक्रमांसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. शाळेत पालक सभा, ऐतिहासिक-सांस्कृतिक स्थळांना शैक्षणिक सहली, जयंती-उत्सव साजरे करणे, तसेच स्त्री सशक्तीकरण, व्यसनमुक्त भारत, साक्षर भारत, मराठी भाषा संवर्धन यांसारख्या समाजजागृतीपर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले जाते.‘पहाट फाउंडेशन’तर्फे दिला जाणारा हा पुरस्कार शाळेच्या सर्वांगीण कार्याचा गौरव आहे. या सोहळ्यात उद्घाटक म्हणून मा. लाठकर, मा. शिक्षणाधिकारी, छत्रपती संभाजीनगर उपस्थित राहणार असून, विशेष अतिथी म्हणून मा. श्वेता परदेशी, सेलिब्रिटी ज्यूरी मिसेस इंडिया सेलिब्रिटी, तसेच इतर मान्यवर सहभागी होणार आहेत.या यशामुळे आदर्श प्राथमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, शाळेच्या शिक्षिका कु. स्मिता कोलते यांनी “पहाट गौरव महाराष्ट्राचा” कार्यक्रमात दिलेल्या उत्कृष्ट प्रस्तुतीमुळे शाळेची ख्याती आणखी वृद्धिंगत झाली आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श प्राथमिक विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post