Hanuman Sena News

नृत्य, गीत अन् लोककलेच्या अविष्काराने चांडक विद्यालयात महागणेशोत्सवाची रंगत...

मलकापूर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महागणेशोत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमात मलकापूर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे मनोहारी सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूरचे तहसीलदार माननीय श्री. समाधान सोनवणे होते. प्रमुख पाहुण्या म्हणून कु. वेदिका सजागणे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मलकापूर, तसेच माननीय श्री. अभिमन्यू खराडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती मलकापूर, माननीय सौ. डॉ. चारुशीला चौधरी, नायब तहसीलदार, मलकापूर, माननीय श्री. राठोड, नायब तहसीलदार, मलकापूर, माननीय श्री. फाळके, विस्तार अधिकारी, मलकापूर आणि माननीय श्री. निंबोळे सर, प्राचार्य, लीलाधर भोजराज चांडक विद्यालय, मलकापूर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ आणि महाराष्ट्र राज्यगीताने करण्यात आली. त्यानंतर आदर्श प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर स्वागतगीताने उपस्थितांची मने जिंकली. तसेच गणपती बाप्पाच्या गीतावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अप्रतिम कलाविष्काराला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.यानंतर लीलाधर भोजराज चांडक विद्यालयातील विद्यार्थ्यांसह मलकापूर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध आशयांची नृत्ये, गीते आणि सांस्कृतिक कलाविष्कार सादर करून भारतीय संस्कृती, परंपरा आणि लोककलेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभागृहात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे सागर कटक व गोंधळी पथकाने सादर केलेला पारंपरिक गोंधळ. पारंपरिक लोककलेच्या या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडले. उपस्थितांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गटविकास अधिकारी कु. वेदिका सजागणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बदलत्या काळात आपल्या संस्कृतीचे जतन करणे अत्यंत आवश्यक असून, संस्कृती संवर्धन ही काळाची गरज आहे, हे त्यांनी आपल्या प्रभावी वक्तव्यातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार श्री. समाधान सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, अशा सण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे संवर्धन करता येते. कार्यक्रमात सहभागी होऊन उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या गौरवामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले.कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन कु. स्मिता कोलते मॅडम यांनी केले. विविध सांस्कृतिक सादरीकरणे, मान्यवरांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा महागणेशोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post