Hanuman Sena News

विप्र गौरव दिनानिमित्त विप्र फाउंडेशनतर्फे "सेवा समर्पण दिन" उत्साहात साजरा; वृक्षारोपण व रक्तदानासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन..


 मलकापूर, दि. ५ जुलै : विप्र गौरव दिन तसेच विप्र फाउंडेशनचे संस्थापक-संयोजक आदरणीय श्री सुशील ओझा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय महामंत्री दामोदर पांडे तसेच विदर्भ प्रांताध्यक्ष शैलेश शर्मा यांच्या प्रेरणेने विप्र फाउंडेशन विदर्भ प्रांत,झोन ९-अ व विप्र फाउंडेशन मलकापूर-खामगाव जिल्हा शाखेतर्फे रविवारी "सेवा समर्पण दिन" विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या उपक्रमाचा उद्देश सेवा, संस्कार, पर्यावरण संरक्षण आणि गोसंवर्धनाच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडणे तसेच जनसामान्यांमध्ये सेवाभाव जागृत करणे हा होता.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता द्वारका नगरी येथील हनुमान मंदिरात पूजा-अर्चना करून करण्यात आली. यावेळी संस्थापक-संयोजक श्री सुशील ओझा यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी जीवनासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच उपस्थित पदाधिकारी व समाजबांधवांनी समाजसेवा आणि संघटन बळकटीकरणाचा सामूहिक संकल्प केला.यानंतर पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
 विविध प्रकारची रोपे लावून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एका वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प केल्यास भावी पिढ्यांना स्वच्छ, सुंदर व हिरवेगार पर्यावरण मिळेल, असे मत व्यक्त केले.सकाळी १० वाजता जीवन ज्योती ब्लड बँकेत युवक प्रकोष्ठाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये युवक व समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान करून मानवसेवेचा आदर्श निर्माण केला.यावेळी जिल्हा प्रचारक सुरेश शर्मा यांनी सांगितले की, वाढदिवस समाजहिताच्या कार्यातून साजरा केल्यास त्याचे खरे सार्थक होते. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून त्यातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. युवकांनी नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष हेमंत शर्मा, मलकापूर तालुका अध्यक्ष मनीष पंडित, तालुका सचिव विशाल दवे, संघटक अशोक व्यास, मार्गदर्शक मदन तिवारी, सहसचिव सुयोग शर्मा, कोषाध्यक्ष नवल व्यास, चेतन शर्मा, शुक्ला सर, पार्थ दवे, अजय शर्मा, शैलेश शर्मा, जगदीश शर्मा, विशाल पंडित यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, विप्र समाजातील मान्यवर तसेच द्वारका नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व उपस्थितांनी संस्थापक-संयोजक श्री सुशील ओझा यांनी दिलेल्या समाजसेवा, संघटन आणि संस्कारांच्या प्रेरणेचा वारसा पुढे नेत भविष्यातही सेवा-आधारित उपक्रम सातत्याने राबविण्याचा तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व राष्ट्राच्या प्रगतीसाठी निरंतर कार्य करण्याचा संकल्प केला.

Post a Comment

Previous Post Next Post