मलकापूर : मलकापूर शहरातील हरीकिसन सोसायटी परिसरातील एका खुल्या प्लॉटमधील सुमारे 60 ते 70 फूट खोल विहिरीत पडलेल्या गोमातेला मलकापूर गोसेवा परिवाराच्या कार्यकर्त्यांनी तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षित बाहेर काढून जीवनदान दिले. या धाडसी बचावकार्यात गोसेवक विठ्ठल बोंबटकार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून दाखविलेल्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर शहरातील ग्रामपंचायत हद्दीतील हरीकिसन सोसायटी परिसरातील एका खुल्या प्लॉटमध्ये असलेल्या विहिरीला कोणतीही सुरक्षा भिंत किंवा संरक्षक कंपाउंड नसल्याने अन्नाच्या शोधात भटकत असलेली एक गाय रात्रीच्या वेळी त्या विहिरीत पडली. सकाळी प्लॉटची साफसफाई करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला विहिरीतील पाण्यात हालचाल दिसून आली. जवळ जाऊन पाहिले असता गाय विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने मलकापूर गोसेवा परिवाराच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली.सूचना मिळताच सकाळी सुमारे 9 वाजता गोसेवा परिवाराचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. विहिरीची खोली अंदाजे 60 ते 70 फूट असल्याने गायीला थेट बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यामुळे हायड्रा मशीनची मदत घेण्यात आली. मात्र, गायीला सुरक्षितरीत्या वर काढण्यासाठी प्रथम विहिरीत उतरून तिच्या शरीराला योग्य प्रकारे पट्टे बांधणे आवश्यक होते.अशा धोकादायक परिस्थितीत गोसेवक विठ्ठल बोंबटकार यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून गायीला अत्यंत काळजीपूर्वक दोन मजबूत पट्टे बांधले. गायीला वर ओढताना कोणतीही अतिरिक्त इजा होऊ नये याची त्यांनी विशेष खबरदारी घेतली. त्यानंतर हायड्राच्या सहाय्याने गायीला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात आले.हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी सुमारे 2 वाजेपर्यंत सुरू होते. अखेर गोमातेला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आल्याने उपस्थित गोसेवक, स्थानिक नागरिक आणि परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.दरम्यान, मलकापूरचे उपविभागीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गायीची तपासणी केली असता ती गेल्या दोन दिवसांपासून विहिरीत अडकून असल्याचा अंदाज व्यक्त केला. पडल्यामुळे तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या होत्या. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी त्या गायीला गोरक्षण केंद्रात पाठविण्यात आले.या घटनेनंतर मलकापूर गोसेवा परिवाराच्या कार्यकर्त्यांनी नागरिक, ग्रामपंचायत, नगरपालिका सदस्य आणि प्रशासनाला आवाहन केले आहे की, परिसरातील उघड्या विहिरी, खोल नाले तसेच सुरक्षा भिंत किंवा झाकण नसलेल्या धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी. अशा उपाययोजनांमुळे भविष्यात जनावरे तसेच लहान मुले व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही आणि संभाव्य दुर्घटना टाळता येतील. यावेळी दीपक चवरे,योगेश चौधरी, सुयोग शर्मा,घनश्याम राठी ,सूरज राजपूत, अक्षय चव्हाण, रामा मेहेसरे,कृष्णा सातव , गणेश किनेकर,पप्पू अग्रवाल ,दत्तू नारखेडे ,नितीन गावंडे, प्रदीप भारंबे, पप्पू संचेती, कुमार सर, इटनारे बंधू उपस्थित होते.
मलकापूर गोसेवा परिवाराच्या कार्यकर्त्यांनी दिले गोमातेला जीवनदान...
Hanuman Sena News
0
إرسال تعليق