Hanuman Sena News

आदिशक्ती श्री.संत मुक्ताबाई यांची मानाची पालखी आज विदर्भाच्या प्रवेशद्वारी; वारकरी साहित्य परिषद तर्फे स्वागत...






मलकापूर:- आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांची मानाची पालखी आज विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर नगरीत दाखल होताच संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “संत मुक्ताबाई की जय"च्या जयघोषात हजारो भाविकांनी पालखीचे उत्स्फूर्त व भक्तिभावाने स्वागत केले. मराठा मंगल कार्यालय मलकापूर येथे स्वागतासाठी वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्ष ह.भ.प.सौ मेघाताई राजेंद्र सैतवाल यांनी ह.भ.प. हरणे महाराज व संत मुक्ताबाई संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, आकर्षक रांगोळ्या, भगवे ध्वज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीचे स्वागत करण्यात आल्याने संपूर्ण शहरात उत्सवाचे आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले.शहरातील विविध सामाजिक, धार्मिक संस्था, व्यापारी, महिला मंडळे, युवक मंडळे तसेच वारकरी संप्रदायातील भाविकांनी पालखी मार्गावर स्वागतासाठी भव्य तयारी केली होती. अनेक ठिकाणी फुलांच्या वर्षावाने पालखीचे स्वागत करण्यात आले, तर महिलांनी पारंपरिक पद्धतीने रांगोळ्या काढून आणि औक्षण करून संत मुक्ताबाईंच्या पालखीप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.पालखीच्या आगमनानिमित्त शहरातील प्रमुख मार्ग भगव्या पताका, स्वागत कमानी आणि आकर्षक सजावटीने उजळून निघाले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने पालखीचे दर्शन घेत संत मुक्ताबाईंच्या चरणी प्रार्थना अर्पण केली. वारकऱ्यांच्या अभंग, टाळ-मृदंगाच्या गजराने आणि हरिनाम संकीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाले.आज मलकापूर येथे पालखीचा मुक्काम असून वारकरी व भाविकांसाठी भोजन, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था आयोजन समिती व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने करण्यात आली आहे. आयोजन समितीच्या माहितीनुसार, संत मुक्ताबाईंची पालखी शनिवारी दि. २७ जून रोजी सकाळी मलकापूर येथून पुढील प्रवासासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मलकापूरकरांनी दाखविलेला उत्साह, भक्तीभाव आणि सेवाभाव हा वारकरी परंपरेचा जिवंत वारसा असल्याचे भाविकांनी यावेळी सांगितले. यावेळी वारकरी संप्रदायातील ह.भ.प.विनायक महाराज खाकरे, ह.भ.प.मधुकर महाराज तायडे,ह.भ.प.अनिकेत महाराज जंगले, मलकापूर तालुका अध्यक्ष ह.भ प. बेबीताई तायडे , शोभाताई झांबरे, सुशीलाताई मोरे, सौ निर्मलाताई पारस्कर, शांताबाई संबारे,शितलताई वर्मा,सौ.वैशाली खापोटे, सौ.हेमलता निरखे, चंचल सैतवाल इ. हरिभक्त पारायण महाराज मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post