मलकापूर (दि. ५ मार्च २०२६):
मलकापूर नगरातील दुर्गा नगर वस्तीमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू संमेलन उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.या संमेलनास ह.भ.प. पुंजाजी महाराज वराडे (भालेगावकर), सौ. रुपाली शेलगेनवार (बौद्धिक प्रमुख, राष्ट्रीय सेविका समिती, मलकापूर नगर) तसेच प्रमुख वक्ते म्हणून नितीन भोळे (तालुका संपर्क प्रमुख) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात दुर्गा वाहिनीच्या कु. गायत्री संजयसिंग राजपूत यांनी “सोने की चिड़िया करती थी बसेरा वह भारत देश हमारा…” हे देशभक्तिपर गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.सौ. रुपाली शेलगेनवार यांनी आपल्या भाषणात नारीशक्तीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास आहे. ज्या स्त्रियांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यांनी समाजात अतुलनीय कार्य केले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श प्रत्येक स्त्रीने आपल्या समोर ठेवावा. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असून तिच्या संस्कारांमुळे सुसंस्कृत समाजाची निर्मिती होते,” असे त्यांनी प्रतिपादन केले.यानंतर नितीन भोळे यांनी हिंदू संस्कृती, परंपरा आणि मूल्ये सुदृढ करण्यासाठी अशा हिंदू संमेलनांची आवश्यकता असल्याचे सांगितले. संघटन शक्तीमुळे कोणतेही कठीण कार्य साध्य करता येते, असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या “पंचपरिवर्तन” संकल्पनेतील सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी, पर्यावरण संवर्धन आणि नागरिक कर्तव्य यांसारख्या मूल्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.ह.भ.प. पुंजाजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजाच्या एकतेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, समाज संघटित असेल तरच देशाचा भविष्यकाळ सुरक्षित राहू शकतो. भारतभूमीने जगाला अनेक अमूल्य देणग्या दिल्या आहेत. शून्याचा शोध — आर्यभट्ट, योगशास्त्र — पतंजली, आयुर्वेद — चरक व सुश्रुत, अर्थशास्त्र — कौटिल्य तसेच वेद-उपनिषदांचे ज्ञान ही भारताची जगाला दिलेली महान देणगी आहे. हा देश प्राचीन काळापासून ज्ञान, विज्ञान आणि संस्कृतीच्या क्षेत्रात अग्रगण्य राहिला आहे.मात्र मॅकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे येथील लोकांच्या विचारांवर परिणाम झाला आणि आपला तेजस्वी, स्वाभिमानी व पराक्रमी इतिहास योग्य प्रकारे शिकवला गेला नाही, ही मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले. दरवर्षी जवळपास पाच लाख मुली बेपत्ता होतात, ही चिंतेची बाब असून समाजाने जागरूक राहून अशा घटनांमागील कटकारस्थान समजून घेण्याची गरज आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाची सांगता भारतमातेच्या आरतीने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन राहुल तांदुळे यांनी केले. हिंदू संमेलनाच्या यशस्वीतेसाठी दुर्गा नगर वस्तीतील हिंदूप्रेमी नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
إرسال تعليق