मलकापूर:- नगर सेवा समिती द्वारा संचालित लीलाधर भोजराज चांडक विद्यालयात छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानमासाच्या औचित्याने प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान चे वक्ते ओम शिंदे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. काळबांडे होत्या, तर संजयसिंह तोमर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.मार्गदर्शन करताना ओम शिंदे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील अद्वितीय आणि सर्वोच्च बलिदानांपैकी एक आहे.” त्यांनी नमूद केले की, इ.स. 1689 मध्ये संगमेश्वर येथे पकड झाल्यानंतर मोगल बादशहा औरंगजेब यांच्या आदेशाने त्यांना अमानुष छळ सहन करावा लागला. धर्मांतराचा दबाव टाकूनही त्यांनी तो ठामपणे नाकारला आणि अखेर फाल्गुन अमावास्येला (११ मार्च १६८९) तुळापूर येथे त्यांनी स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले.शिंदे यांनी पुढे सांगितले की, इतक्या भीषण छळास सामोरे जात असतानाही संभाजी महाराजांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. ही अढळ निष्ठा, अदम्य धैर्य आणि धर्माभिमान यामुळे त्यांचे बलिदान इतिहासात अजरामर झाले आहे.यावेळी त्यांनी तरुण पिढीला उद्देशून सांगितले की, आज काही ठिकाणी डीजे व चित्रपट संगीताच्या गोंगाटात बेफाम नाचणे ही प्रवृत्ती महाराजांच्या कर्तृत्वाशी सुसंगत नाही. तरुणांनी उथळ मनोरंजनापेक्षा राष्ट्रनिष्ठा, संस्कार, शिस्त आणि चारित्र्यनिर्मिती यांना प्राधान्य द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.प्रत्येक विद्यार्थ्याने बलिदानमासात संभाजी महाराजांच्या जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यातून राष्ट्रप्रेम, कर्तव्यपरायणता आणि स्वाभिमान यांची प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कला शिक्षक दिपक येवलकर यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान हे जगातील सर्वश्रेष्ठ बलिदान – ओम शिंदे
Hanuman Sena News
0
Post a Comment