मलकापूर (प्रतिनिधि) : स्थानिक नगर सेवा समिती द्वारा संचालित ली. भो. चांडक विद्यालय मलकापूर येथील उपप्राचार्य विजय सदावर्ते दि. 31 ऑगस्ट रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे संस्था व शाळेच्या वतीने त्यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम शनिवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी संपन्न झाला.सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर सेवा समितीचे कार्यवाह दामोदर लखानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चैनसुख संचेती व नगर सेवा समितीचे कोषाध्यक्ष सुगनचंद भंसाली उपस्थित होते. विजय सदावर्ते यांच्या 29 वर्षाच्या सेवाकाळात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून नगर सेवा समिती, चांडक विद्यालय मलकापूर तसेच आदर्श सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. शासकीय नियमानुसार वयाची 58 वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी सेवानिवृत्त होतात. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन करुन आमदार संचेती यांनी आपल्या प्रभावी वाणीतून सेवानिवृत्तीचा अर्थ विषद केला. शिक्षक प्रतिनिधी नितीन चव्हाण यांनी विजय सदावर्ते यांच्या कौटुंबिक व शालेय सेवा काळातील घटनांवर प्रकाश टाकला. आपल्या सत्काराला उत्तर देताना सदावर्ते यांनी आपल्या आयुष्यात आई वडीलांचे विशेष स्थान असून त्यांच्या आशिर्वादाने जीवन सुकर झाले असे भावनिक उदगार काढले. सेवाकाळात सहकारी वृंदांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. गो. वि. महाजन विद्यालयाचे माजी प्राचार्य भूषण महाजन यांनी सदावर्ते यांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले. समारोपीय भाषणात अध्यक्ष महोदयांनी सेवानिवृत्तीनंतर संघकार्यात वेळ कारणी लावून जीवन कृतकृत्य करण्याचे मार्गदर्शन करुन त्यांच्या निरामय दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र गणगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारीवृंदांनी सहकार्य केले.
ली. भो. चांडक मलकापूर विद्यालयातील विजय सदावर्ते यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न...
Hanuman Sena News
0
Post a Comment