संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा २०२६ साठी सर्व पात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा २०२६ साठी सर्व नियमित व माजी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करण्याबाबत विद्यापीठाने निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देणाऱ्या या निर्णयामुळे विद्यापीठ विकास मंचाचे निमंत्रक तथा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री.राजेंद्रप्रसाद पांडे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
शासन निर्णयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री.पांडे यांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी विद्यापीठाचे मा. कुलगुरू साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांप्रती विद्यापीठाने संवेदनशीलता दाखवावी आणि नियोजित परीक्षा वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली होती.या मागणीची दखल घेत विद्यापीठाने हिवाळी परीक्षा २०२६ साठी सर्व नियमित व माजी विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णतः माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी महाविद्यालयात शुल्क भरले असून ते विद्यापीठात जमा केलेले नसल्यास संबंधित विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क परत करण्याची कार्यवाही करावी. विद्यापीठात ऑनलाइन शुल्क जमा केले असल्यास नियमानुसार परतावा देण्यात येणार आहे.
तसेच, परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही परीक्षा शुल्क किंवा अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी आपले परीक्षा अर्ज २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भरावेत, तर महाविद्यालयांनी अर्जांची पडताळणी करून ते निर्धारित मुदतीत ‘व्हेरिफाय ’ करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणींची जाणीव ठेवून त्यांच्या हितासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या श्री. राजेंद्रप्रसाद पांडे यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.हा निर्णय विद्यार्थीकेंद्रित भूमिकेचा आणि शैक्षणिक क्षेत्रातील संवेदनशीलतेचा सकारात्मक प्रत्यय देणारा ठरला आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून,श्री.राजेंद्रप्रसाद पांडे यांच्या पाठपुराव्याला मिळालेले हे यश महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
Post a Comment