Hanuman Sena News

शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूडला बंदी; नियम कागदावरच? प्रशासनाच्या कारवाईकडे पालकांचे लक्ष...



मलकापूर : विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने शाळांच्या परिसरातील अस्वास्थ्यकर खाद्यपदार्थांच्या विक्रीवर निर्बंध लागू केले आहेत. मात्र मलकापूर शहरातील शाळांच्या परिसरात या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का, असा सवाल पालक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळेच्या आवारात तसेच शाळेच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटरच्या परिसरात जास्त चरबी, ट्रान्स फॅट, साखर व मीठ असलेल्या HFSS खाद्यपदार्थांची विक्री, मोफत वाटप आणि जाहिरात करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमांतर्गत जंक फूड, डीप फ्राय केलेले पदार्थ, चिप्स, साखरयुक्त पेये, शीतपेय, चॉकलेट, आईस्क्रीम यांसारख्या पदार्थांवर निर्बंध लागू होतात.कँटीनसाठी FSSAI परवाना बंधनकारक शाळेतील कँटीन, वसतिगृहातील स्वयंपाकघर, माध्यान्ह भोजन व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांना अन्नपुरवठा करणाऱ्या संस्थांकडे वैध FSSAI परवाना किंवा आवश्यक नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवान्याशिवाय शाळेत अन्नपुरवठा करण्यास नियमांनुसार परवानगी नाही.नियमांचे पालन करण्याची जबाबदारी कोणाची? या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केवळ विक्रेत्यांची नसून शाळा प्रशासन व व्यवस्थापनानेही नियमांचे पालन सुनिश्चित करणे अपेक्षित आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित यंत्रणेकडून कारवाई होऊ शकते. FDA कडून शाळांमध्ये तपासणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.मलकापूरमध्ये प्रशासनाचे लक्ष कधी जाणार? शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्पष्ट नियम व कायदेशीर चौकट तयार केली असताना, मलकापूर शहरातील शाळांच्या परिसरात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ खाद्यपदार्थांची विक्री होत असल्यास संबंधित विभागांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित नियम केवळ कागदावर न राहता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी मलकापूर प्रशासन, अन्न व औषध प्रशासन आणि संबंधित स्थानिक यंत्रणांनी संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post