मलकापूर : 9/7/2026 तालुक्यातील उमाळी गावात अनुसूचित जातीच्या एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांवर गावातील काही व्यक्तींनी जातिवाचक शिवीगाळ, मारहाण व धमकावल्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित महिला, तिची आई, कुटुंबातील इतर महिला सदस्य तसेच अल्पवयीन मुलगी यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी धाव घेतली होती.मात्र, पीडितांच्या म्हणण्यानुसार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीची योग्य प्रकारे नोंद घेतली नाही. तसेच फिर्यादींनी सांगितलेल्या सर्व घटना व आरोपींची नावे तक्रारीत नमूद न करता तक्रारीचे स्वरूप बदलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.याशिवाय, पीडित महिला व अल्पवयीन मुलीला रात्री उशिरापर्यंत, सुमारे रात्री ३ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये थांबवून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला आणि अल्पवयीन मुलींच्या संरक्षणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच विद्यमान कायद्यांचे पालन झाले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार योग्य तक्रार नोंदविण्यात यावी तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच, प्रकरणाच्या स्वरूपानुसार अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ तसेच इतर लागू कायद्यांनुसार योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून पीडित कुटुंबाला संरक्षण देण्याचीही विनंती करण्यात आली आहे.सदर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पीडित महिला व कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी अमोल लक्ष्मण टप, अमरदीप राजपूत, अमोल राजपूत, पप्पू ठाकूर,अमरदीप कांबळे, विनोद नामदेव धोत्रे, श्रावण गायकवाड, ज्योती गायकवाड, समर्थ गायकवाड, निर्मला गायकवाड, लक्ष्मीकांत जेठार, भारती गायकवाड, पूजा गायकवाड, विजय तांबे, दीपक सातव, आकाश बोरले ई. निवेदनावर सही केलेले आहेत.
अनुसूचित जातीच्या महिला व अल्पवयीन मुलीला न्याय नाकारल्याचा आरोप; पोलिसांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी
Hanuman Sena News
0
Post a Comment